Home

निसर्गसेवेचे द्योतक … आम्हीच भारतीय संस्कृती … म्हणजेच अरण्य संस्कृती. आदी अनादी काळी आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी जो संस्कृतीचा पाया रचला तो अरण्यांत वसून रचला म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीला ‘अरण्य संस्कृती’ असे म्हणतात. अत्यंत विचारपूर्वक, विज्ञानाच्या कसोटीवर तोलून मापून आणि पर्यावरणपूरक अशीच सर्वी कर्मकांडे ही त्यांची महानता. त्याचे शाश्वत परिणामदेखील पिढ्यान पिढ्या अनभवू शकता येणे अशी रचना उभी करणे म्हणजे फार मोठ्ठी विद्वत्ता लागते. आज होणारे निर्माण कार्य म्हणजे अनिश्चितकालीन होणारा विकास जो नक्कीच पर्यावरणपूरक नाही. अशातच आपली जवाबदारी इथेच वाढते ती ठेविले अनंते जपण्याची, त्यात वृद्धी करण्याची, त्याला निस्वार्थ सेवेची साद देण्याची. आपण आज फार संकुचित विचारसरणीला जोपासणारे झालो आहोत कारण २००० वर्ग. फूट. असलेले माझे घर आणि त्यात राहणारी २-३ व्यक्ती एवढीच माजी जवाबदारी एवढेच माझे जग , बाकी त्याच्या बाहेर मला काही घेणे-देणेच नाही. वसुधैव कुटुंबकम च्या मारे गोष्टी करायच्या; परंतु वैश्विकतेचा भाव स्वतः आत्मसात नाही करायचा, कारण त्याला भले मोठे धाडस लागते हो. अशाने कसे चालेल. ‘जे चित्ती ते वृत्ती’ असे म्हणतात तेव्हा आधी मनात मी गृहवासी किवा अमुक शहरवासी किवा तमुक देशवासी नाही तर मी “विश्वावासी” आहे, हा भाव धारण केला की तो कुठेतरी निश्चितच वृत्तीत आणि कृतीत येईल. अहो … साधे आपल्या घरच्या विहिरीतील पाणीच ५०० वर्षे जुने असलेले आपण काढतो, आज आमच्या विहिरी आटत चालल्या आहे मग पुढच्या पिढीसाठी काही वाचवायचे तर दूरच ; पण साधे आम्ही जतन सुद्धा करत नाहीय, तर या पापाचे धनी पुढच्या पिढ्या का ? असा नेहमी विचार मनात येतो. ही वसुंधरा दरवर्षी लाखो लिटर अतिशय शुद्ध पाणी अगदी मोफत दारात आपल्याला देत असते, ते जमा करणे, जमिनीत मुरवणे, अडवणे व जिरवणे साधे एवढे जरी केले तरी फार मोट्ठे पुण्य पदरी पडेल; पण शहरात विकासाच्या नावावर माती लुप्त करून टाकली आणि सिमेंट चे आवरण चढवून एवढे बिसलरी पेक्षा हे शुद्ध पाणी गटारात सोडण्यास आम्ही निर्लज्ज झालो आहे. धार्मिकतेच्या नावावर दगड धोंड्यांपुढे खूप सोंगे करायला आपण शिकलो आहे, भगवंताची व्याख्या करताना निर्गुण, निराकार, अनंतकोटी, ब्रम्हांडनायक व जिथे जिथे भगवंत आहे तिथे तिथे जीवश्रुष्टी आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे आकारीत मूर्तीची किवा व्यक्तीची पूजा करायची असे आमचे धोरण. अरे पण या श्रुष्टीत निर्गुण निराकार असे आही तरी काय ? तर ती हवा. जिला कुठलाच गुण नाही आकार नाही. हवेतील मुख्य घटक म्हणजे प्राणवायु, ‘जो वायूच प्राण आहे’ असे ओळखून बहुतेक आमच्या पुर्ख्यानी त्याला अत्त्योग्य नाव ठेवले असेल “प्राणवायू”. साऱ्या ब्रम्हांडाचा तोल पृथ्वीवरील प्राणवायू मुळे सावरला आहे तर हा येथील निसर्गात मुबलक असल्यामुळे अनंतकोटी आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की प्राणवायू पूजक किती व मारक किती ?? तर मारकच सापडतील. वृक्षपूजा काळाची गरज असताना वृक्षाला हळद-कुंकू-अक्षदा-हार-बेल-फुल एवढे अर्पून पूजन न करता जास्तीत जास्ते झाडे लावून, त्यांना दत्तक घेऊन पोटच्या मुला-बाळांप्रमाणे सांभाळ केला तर आम्ही खरे उपासक होऊ. ६० वर्षे आयुष्य जगण्यास आयुष्यात १७ वृक्ष्यांची गरज एका व्यक्तीला असते. नागपूरचा आभास केला तर लोकसंख्या ३० लाख, अस्तित्वात झाडे १८ लाख; म्हणजे एकाचे धड अर्धेही झाड नाही. लोकं आयुष्यभर एकही झाड लावत नाही नि अंत्यसंस्काराला त्यांच्यासाठी २ वटवृक्ष तोडून त्यावर जाळावे लागते, तेव्हा आज अग्निसंस्कार कितपत योग्य आहे आणि तो कितीकाल आणखी जोपासत राहायचा याचाही विचार करा. रोज जी फळे खातो त्याच्या बिया कचऱ्यात फेकून तिचे अस्तित्व संपवन्यापेक्षा तिला मातीत पुरा, जीवनदान देण्याचा संस्कार जोपासण्यास मदत होईल. पक्ष्यांना खायला फळझाडे असतील तर त्यांच्या संख्येचा मेळ साधता येईल, जमिनीत पाण्याची पातळी वाढेल, मृदेचे संवर्धन होईल, पक्ष्यांना घरटी बांधून आपला संसार थाटता येईल, मुंग्या-माकोद्यांचे वारुळे बनतील, वातावरणातील हवा शुद्ध होईल, गार वारा मिळेल जेणेकरून पंखेच्या विजेची बचत होईल सावली मिळेल, त्याच्या वाळलेल्या पाना-फांद्यापासून खत बनवता येईल आणि प्राणवायूचा कळस होईल. व्यक्तीला आजकाल व्यक्ती तितका महत्वाचा उरलेला नाही, इंटरनेटच्या, संगणकाच्या आणि इलेक्ट्रोनिक च्या जगात कुणाला कुणावर निर्भर राहण्याची गरजच भासत नाही, प्रेत्येकजन आत्मनिर्भर झाला आहे, मनुष्यसेवेचा काळ लोटतोय; अशात आपली गरज या काळ्या आईला आहे, धरणी मातेला आहे, या निसर्गाला आहे, सध्या ती संकटात आहे, निसर्गसेवक व्हा, निसर्गपूजक व्हा. पूजा तर आपण निस्वार्थ भावाने करतो पण निसर्वापूजेत जरी स्वार्थ ठेवला तरी तुम्हाला बेरीज करून नव्हे तर गुणाकार करूनच परतफेड मिळेल. निसर्ग हाच माणसाचा सच्चा मित्र आहे, गुरु आहे, तेव्हा ही गुरुसेवा करण्यासाठी धडपडणे म्हणजे खरे पुण्यकार्य आहे असे मला वाटते. बघा विचार करा आणि एक जरी विचार आला असेल तर कृती करा.

आपल्या आईची काळजी ही आपली काळजी बनवा

Advertisements